Deception Point by Dan Brown (दर्जा : ****)

May 7, 2006

Deception Point
 “When a NASA satellite discovers an astonishingly rare object buried deep in the Arctic ice, the floundering space agency proclaims a much-needed victory. A victory with profound implications for NASA policy and the impending presidential election. To verify the authenticity of the find, the white house calls upon the skills of intelligence analyst Rachel Sexton. Accompanied by a team of experts, including the charismatic scholar Michael Tolland. Rachel travels to the Arctic and uncovers the unthinkable : evidence of scientific trickery. A bold deception that threatens to plunge the world into controversy. But before she can warn the President, Rachel and Michael are ambushed by a deadly team of assassins. Fleeing for their lives across a desolate and lethal landscape, their only hope for survival is to discover who is behind this masterful plot. The truth, they will learn, is the most shocking deception of all.”

मी सहसा इंग्रजी पुस्तके वाचत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असल्याने इंग्रजी भाषेत मी फारसा पारंगत नाही. इंग्रजी भाषेतील पुस्तके समजत असली तरी त्यांचा रसास्वाद घेता येत नाही. परंतू अनेक वर्ष इंग्रजी भाषेचा संपर्क आल्याने आता हळूहळू त्या भाषेचा आस्वाद मला घेता येतोय. याचे श्रेय मला टाईम्स ऑफ इंडीया या इंग्रजी दैनिकाला द्यावीशी वाटते. या इंग्रजी वर्तमानपत्राच्या सातत्यपुर्ण वाचनाने आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. याशिवाय इंग्रजी भाषेतून घेतलेले संगणकाचे ज्ञान आणि तदनंतर इंटरनेटची मुशाफीरी यांनीही माझी इंग्रजी सुधारण्यात चांगलाच हातभार लावला.

पुस्तक वाचनास सुरुवात केल्यानंतर मी प्रथमच प्रसिध्द लेखक डॅन ब्राऊन यांची डिसेप्शन पॉइंट ही कादंबरी वाचण्यास घेतली. हे पुस्तक वाचायला घेण्यापुर्वी त्यामध्ये काय आहे, अथवा डॅन ब्राऊन यांची लेखनशैली कशी आहे, याबद्दल मला यत्कींचीतही कल्पना नव्हती. परंतू हे पुस्तक हातात घेताच अगदी पहिल्या पानापासूनच मी त्याच्या प्रेमात पडलो. विषय माझ्या आवडीचा अर्थात विज्ञानकथा अधिक अमेरिकन राजनीती असा होता. त्याचबरोबर डॅन ब्राऊन यांच्या सहजसुंदर आणि उत्कंठावर्धक भाषाशैलीने मला खिळवून ठेवले आणि हे पुस्तक पुर्णपणे वाचण्यास भाग पाडले.

या पुस्तकाची कथा वर इंग्रजीत दिल्याप्रमाणे अस्तीत्वासाठी झगडणारी अमेरीकन अंतराळसंस्था नासा आणि राष्ट्रपतीपद मिळवण्यासाठी चाललेली उमेदवारांची जीवघेणी चढाओढ यांची आहे. महत्वाच्या मोहिमांत सातत्याने अपयश आल्याने हतबल झालेली अमेरीकन अवकाशसंस्था नासा कुठल्यातरी जोरदार यशाच्या शोधात असते. या हतबलतेतून मार्ग काढण्याठी एक उच्चपदस्थ अधिकारी एका नव्या शोधाचा बनाव रचतो. तो बनाव उघड होऊ नये म्हणून त्याला अमेरीकेच्याच सैनिकी कमांडोंचा उपयोग अमेरीकी नागरीकांचेच हत्यासत्र सुरु करावे लागते. हा बनाव उघडकीस आल्यास विद्यमान अमेरीकेचे अध्यक्ष, जे नासाचे कट्टर समर्थक असतात, त्यांची पुनर्निवडणूक धोक्यात येऊ शकते. आणि त्यांचे विरोधक जे नासाला अमेरीकेचे निरर्थक उधळपट्टी करणारे बाळ समजतात, ते निवडून येऊ शकतात. हे टाळण्यासाठी कुठल्याही थराला जायची त्या अधिकाऱ्याची तयारी असते. या जीवघेण्या संघर्षात नायक मायकेल टॉलंड आणि नायीका राचेल सेक्सटन हे दोघेही सापडतात. व कथेच्या अंती तेच या रहस्याचा उलगडा करतात.

एकंदरीत यापुस्तकाची कथा एखाद्या देमार इंग्रजी चित्रपटाला साजेशी आहे. भविष्यात या कादंबरीवर आधारीत चित्रपट आल्यास आश्चर्य वाटू नये. पुस्तकाची कथा छान आहे. शेवट पर्यंत खलनायक कोण हे वाचकापासून लपऊन ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. लेखकाची लेखन शैली उत्कृष्ट आहे. त्यानी या पुस्तकाचे लिखाण अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत केले आहे, त्यामुळे इंग्रजी कच्चे असलेल्या वाचकांनाही ते पचवण्यास अवघड नाही. संपुर्ण पुस्तकात लेखकाने क्लिष्ट वैज्ञानिक माहीती दीली आहे, ती सर्वसाधारण वाचकाला जड जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यासही चालू शकेल. वाचकाला अमेरीकन समाज, त्यांची विचारसरणी, त्यांचा इतिहास, त्यांची वैज्ञानिक आणि लष्करी प्रगती, त्यांच्याकडे अध्यक्षांना देंण्यात येणारे अनन्यसाधारण महत्त्व याची माहिती असल्याच हे पुस्तक अधिक समजेल व त्याचा पुर्ण रसास्वाद घेता येईल.


मराठीतील निवडक विज्ञानकथा संपादन : निरंजन घाटे दर्जा (****)

March 30, 2006

vidnyan.jpg“विज्ञानकथा हा प्रकार मराठीमध्ये तसा नवा नाही. इ.स.१९०० पासून मराठीत विज्ञानकथा लिहिली जात आहे. तेव्हापासूनच्या गेल्या शंभर वर्षातील प्रातिनिधिक विज्ञानकथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने एकत्र केलेल्या ह्या विज्ञानकथा वाचताना विज्ञानकथेचे स्वरुप कसे बदलत गेले तेही आपल्या लक्षात येते.
 मराठी विज्ञानकथेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीत अनेक मोठमोठ्या लेखकांचा हातभार लागला आहे. मराठी विज्ञानकथेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या संग्रहातील कथा जशा उपयोगी आहेत त्याच बरोबर एकविसाव्या शतकात जाताना मराठी विज्ञानकथेचे साहाय्यही वाचकाला होईल यात शंकाच नाही.”
 विज्ञानकथा हा पुर्वीपासून माझा आवडीचा विषय आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन असल्याकारणानेही त्यातली तांत्रीक क्लीष्टता मला त्रास देत नाही. या कथा वाचण्यापूर्वी विज्ञानातील काही पायभूत नियम आणि माणसाची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळातील अपेक्षा वाचकाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या कथा पुर्णपणे काल्पनिक असुन अतिशयोक्तीपुर्ण आहेत असा समज होण्याची शक्यता आहे. विज्ञान कथा म्हणजे सध्याच्या प्रचलीत विज्ञानाच्या पायावर उभारलेली परंतु भविष्याच्या संभाव्य वैज्ञानिक प्रगतिचा कळस असलेली काल्पनिक कथा असते. ती काल्पनिक असते पण कपोलकल्पित मात्र नसते.
 ज्यांना जुन्या काळातील एच. जी. वेल्स, जुल्स व्हर्न या लेखकांनी लिहिलेल्या विज्ञान कथांचा परिचय आहे, त्यांना हे निश्चितच पटेल की विज्ञानकथा म्हणजे अतिशय कल्पक आणि कुषाग्र बुध्दीच्या लेखकाने भविष्याचा घेतलेला वेध असतो. या लेखकांनी एकोणिसाव्या शतकात, ज्यावेळी माणूस उडू शकतो असे म्हणणाऱ्या माणसांना वेडे समजले जायचे, विमानांची आणि अवकाश यानांची कल्पना केली होती आणि त्यावर विज्ञानकथा लिहिल्या होत्या. गंमत म्हणजे त्यानी केलेला कल्पनाविलास आज बऱ्याच अंशी खरा ठरलेला आहे. विज्ञानकथा माणसातील वैज्ञानिक जागा करतात आणि त्याला भविष्याचा वेध घ्यायला लावतात, म्हणून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुलाचा बौधिक आणि वैज्ञानिक विकास घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने त्याला विज्ञानकथा, कादंबऱ्या पुरविणे आवश्यक आहे.
 या पुस्तकात श्री निरंजन घाटे यांनी विसाव्या शतकातील मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानकथाकारांवर दीर्घ संशोधन करुन वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळे विषय आजमावणाऱ्या १८ अतिशय सुंदर विज्ञानकथांचा संग्रह पेश केला आहे. त्यांचा या विषयावरील अभ्यास दांडगा आहे. स्वतः एक विज्ञानकथाकार असल्याने या विषयाची त्यांना चांगली समजही आहे. यापुस्तकासाठी त्यानी २० पानी लांबलचक प्रस्तावना लिहीली आहे, ती काही मला आवडली नाही. प्रस्तावना कधीही एक-दोन पानांपेक्षा जास्त लांब नसावी असे माझे मत आहे. या प्रस्तावनेत त्यानी विज्ञानकथा म्हणजे काय, ती कशी असावी आणि बऱ्याच लोकांनी विज्ञानकथेच्या नावाखाली हिन दर्जाच्या साहित्याचा कसा बाजार मांडला आहे याचे प्रदिर्घ विवेचन केले आहे. माझ्यामते याविषयावर वाद घालण्यासाठी एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना ही योग्य जागा नव्हती.
 या पुस्तकातल्या सर्व १८ कथा अप्रतिम आहेत यांत काही शंका नाही, परंतु अनु. क्र. १ आणि २ च्या जुन्या काळातील “चंद्रलोकातील सफर” आणि “बायकांना उजव्या डोळ्याने दिसत नाही” या कथा काहिशा सुमार दर्जाच्या आणि रटाळ आहेत. कथा जुन्या काळातील असल्याने आणि बहूतेक, संपादकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या विदेशी साहीत्यांचे स्वैर अनुवाद असल्या कारणाने, लेखकांना निटशा हाताळता आल्या नाहीत. दुर्दैवाने पुस्तकाच्या आरंभिच दोन कथा रटाळ असल्याने निरस होतो. परंतु बाकीच्या सर्व कथा मात्र उत्तम दर्जाच्या आहेत. संपुर्ण संग्रहात “गिनिपिग” “कनेक्शन” आणि “कालदमन” या कथा मला सर्वात जास्त आवडल्या. प्रत्येक विज्ञानप्रेमीने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.


वी दी नेशन (वाया गेलेली वर्षे) – वि. स. वाळींबे (मु. ले. नानी पालखीवाला) दर्जा (****)

March 25, 2006

nation.jpg
     नानी पालखीवाला हे विसाव्या शतकातले भारतातले एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. पेशाने वकील असलेले ही व्यक्ती, भारतीय कायदा आणि घटना यांमध्ये तज्ञ समजली जाते. वकीली व्यतिरीक्त विविध महाविद्यालयांतून त्यांनी अध्यापनाचे कामही केले. टाटा समुहासह काही नामांकीत कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काही काळ ते अमेरीकेतील भारताचे राजदूतही होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. भारतीय कायदा आणि घटना यांचा त्यांना नितांत आदर होता आणि भ्रष्टाचाराविषयी विलक्षण चीड होती. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना भारतीय लोकशाही आणखी मजबूत व्हावी, समाजातल्या सर्व थरातील लोकांनी आपले परस्पर भेदभाव विसरून, एक भारतीय म्हणून गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती.
     वी दी नेशन हे पुस्तक म्हणजे त्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेल्या विविध भाषणांचे आणि व्याख्यानांचे संकलन आहे. या सर्व भाषणातून त्यांनी भारतीय कायदा, घटना, अर्थव्यवस्था, लोकशाही, समाजवाद यांवर योग्य टिकाटीप्पणी केली आहे. काही ठीकाणी त्यांचे म्हणणे अतिशयोक्तिपुर्ण वाटते पण पुर्णपणे नाकारताही येत नाही. या पुस्तकातील त्यांच्या सर्व मतांशी मी सहमत होत नाही पण एकंदरीत त्यांचे बरेचशे विचार पटण्याजोगे आहेत. एकंदरीत त्याच्या लेखनावरून ते आदर्षवादी, समाजवादविरोधी, भांडवलशाही समर्थक असल्याचे दिसते. संबंध पुस्तक हे त्यांच्या विविध ठीकाणी केलेल्या भाषणांचा संग्रह असल्याकारणाने बऱ्याच ठीकाणी अनेक गोष्टींची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे पुस्ताकात तेच तेच पुन्हा वाचावे लागल्याने कंटाळा येतो. भारताच्या वार्षिक अर्थसंकल्पाबाबतचे त्यांचा भाषण संग्रह या पुस्तकाचा सर्वात रटाळ भाग झालेला आहे. एकंदरीत पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनिय आहे. वि. स. वाळींबे यांनी या मुळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद छान केला आहे. भारतीय राज्यघटना, राज्यशास्त्र याविषयांत पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
 

 

 


भारत विकणे आहे – वि. स. वाळींबे (मु.ले. चित्रा सुब्रमण्यम) दर्जा (***)

December 15, 2005

     विकासाचा मार्ग अनुसरताना भारताला कोणता त्रास सोसावा लागला, यापेक्षा विकास करून घ्यायला नकार दिल्यामुळे या देशाला कोणत्या अनावश्यक यातना सहन कराव्या लागल्या, याचा ‘भारत विकणे आहे’ या पुस्तकात वस्तुस्थितीच्या आधारे मार्मिक उहापोह करण्यात आला आहे. आपल्याला जेव्हा अभिमान वाटायला हवा तेव्हा आपण शरमून जातो, आणि जेव्हा आपली आपल्यालाच लाज वाटायला हवी तेव्हा आपण स्वतःवर खूष होऊन जातो. हे असे का घडते, याचे परखड विवेचन म्हणजे चित्रा सुब्रम्हण्यम यांचा हा महत्त्वपूर्ण लेखसंग्रह. वर्तमानाकडे पाठ फिरवून आपण एकतर वेदांचा आधार शोधू लागतो किंवा भविष्यकाळासंबंधी जागतिक बॅंकेकडे आशाळभूतपणे पाहू लागतो. हा लेखसंग्रह म्हणजे गेल्या पंन्नास वर्षातील आपल्या बालिश वर्तनाचा सडेतोड आलेखच. आपण, आपल्या सभोवतालचे वास्तव आणि इतर वास्तवांच्या संदर्भात या वास्तवाचे मूल्यमापन या संबंधात अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य हा लेखसंग्रह समर्थपणे पार पाडतो. आपल्या पुढा-यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विदूषकांसारखे वर्तन करून, स्वतःचे आणि देशाचे कसे आणि किती हसे करून घेतले, हे जाणून घेण्यासाठी ‘भारत विकणे आहे’ वाचायलाच हवे.
     “इंडीया इज फॉर सेल” या चित्रा सुब्रमण्यम यांच्या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. चित्रा सुब्रमण्यम एक नामवंत पत्रकार असून प्रामुख्याने भारताच्या परराष्ट्रविषयक घडामोडींचा मागोवा घेतात आणि वर्तमानपत्रात त्याविषयी बातम्या, लेख लिहीतात. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा आहे. या क्षेत्रात वावरताना त्यांचा अनेक राजकारण्यांशी आणि उच्चपदस्थ अधिका-यांशी संबंध येतो. त्यांच्याशी भारताच्या परराष्ट्रविषयक धोरणासंबंधी चर्चा करण्याचा योग येतो. हे करताना त्यांना अनेकदा असा अनुभव आला की ज्या लोकांना भारत सरकारने करोडो रुपये खर्च करुन विदेशात इतर देशांसमोर भारताचे मत मांडण्यास पाठविले आहे ते किती नालायक आहेत. निव्वळ फुकटचा विदेश प्रवास या एक कलमी कार्यक्रमाखाली ही लोक विदेशी परीषदांना जातात आणि आपल्या अडाणीपणामुळे तिथे भारताची पार नाचक्की करुन टाकतात. भारत सरकारही निर्बुध्द्पणे अशा लोकांना विदेषवारीसाठी पाठवित असते. यापुस्तकात लेखिकेला आलेल्या याच अनुभवांचे परखड विवेचन आहे. लेखिकेने या पुस्तकात कोणाचेही थेट नाव जरी घेतलेले नसले तरी स्पष्ट घटनाक्रम, तारखा आणि त्याबरोबरच व्यक्तींची सुचक नावे यांच्या आधारे ति व्यक्ती कोण हे समजायला आपल्यासारख्या चाणाक्ष वाचकाला वेळ लागत नाही.
     एकंदरीत हे पुस्तक छान असले तरी संपुर्ण पुस्तकात केवळ टीकेचा सुर असल्याने ते रटाळ झाले आहे. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत केवळ टीका आणि टीकाच. एकंदरीत लेखिका यासर्व राजकारण्यांवर खूप रागावलेली दिसते. परंतु लेखिकेने दाखविली आहे तेवढी परिस्थिती गंभीर असेल असे मला वाटत नाही. राजकारणात आणि सरकारी अधिका-यांत वाईटाबरोबर चांगली माणसेही असतात. पण बाईंनी संपुर्ण पुस्तकात नकारार्थि भूमिका घेतलेली आहे ते मला पटले नाही. एकंदरित हे पुस्तक माहितीपुर्ण आहे आणि भारत सरकारला मार्गदर्शक आहे. त्रयस्थ व्यक्तिचे परिक्षण या भूमिकेतून यातून भारत सरकारला काही पाठ मिळाला असेल तर या पुस्तकाचे चीज झाले असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय पिठावर कोणतीही व्यक्ती पाठविण्यापुर्वी ती व्यक्ती त्या कामासाठी खरोखर योग्य आहे का हे तपासून नंतरच त्याव्यक्तीची तिथे रवानगी करणे योग्य ठरेल. केवळ एखादी व्यक्ती एखाद्या खात्याचा मंत्री आहे म्हणून त्याला अशा ठीकाणी पाठवणे अयोग्य आहे. मंत्री म्हणून पद सांभाळणारी व्यक्ती ही जनसामान्यांनी निवडून दिलेली व्यक्ती असते. ती व्यक्ती ती जे खाते साभाळत आहे त्यात तज्ञ असेलच असे नाही. त्याकामासाठी भारत सरकार त्यांना उच्चशिक्षित आय.ए.एस. अधिकारी पुरविते आणि त्या खात्याचा कारभार मुख्यतः तेच पाहतात. मंत्री म्हणजे केवळ एक रबर स्टॅंप असतो. त्यामुळे अशा अनाडी मंत्र्यांना आंतरराष्ट्रीय परीषदांना पाठविणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे या लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे.


मी वाय. सी. – यादवराव पवार (दर्जा *****)

December 8, 2005

yc.jpg
“मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील बेताज बादशहा वरदाभाई उर्फ वरदराजन मुदलियार याचे साम्राज्य उध्वस्त करणा़ऱ्या वाय. सी. पवार नावाच्या पोलीस खात्यातील झंझावाताची ही आत्मकथा. संकल्प पक्का असेल आणि ध्येय निश्चित असेल तर साध्या कुटुंबात जन्म घेतलेला एक पोलीस अधिकारी गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि दंगली यांच्यावरही अंकुश ठेवू शकतो. चांगुलपणाचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि कठोरतेचे जिवंत प्रतिक असलेल्या या सच्चा पोलीस अधिकऱ्याचे वादळी आत्मचरित्र एकूणच खचलेल्या समाजजीवनाच्या अंध:कारात आशेचा किरण ठरेल.”
माझा जन्म मुंबईत झाला. १९७२ पासून ते १९९६ पर्यंतचा काळ मी मुंबईत काढला. मुंबईत असताना या महानगराचे फायदे जसे झाले तसेच त्याच्या समस्यांचीही जाण झाली. भारतभरहून येणाऱया नशिब आजमावणाऱ्यांचे लोंढे आणि त्यांना आश्रय देणाऱ्या येथील झोपडपट्ट्या. ह्या झोपडपट्ट्या म्हणजे गुन्हेगारांचे आगार झाले होते. पोलीसही त्यांना हप्त्यासाठी साथ द्यायचे. अशावेळी वाय. सी. पवार या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचे आगमन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मुंबईतल्या गुन्हेगारीचा पुरता बिमोड केला. तो मी स्वत: अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मी वाचायला घेतले.
लेखन अतिशय सुरेख झालेले असून धावते आहे. त्यामुळे कुठेही रटाळपणा आलेला नाही. वाय. सींचे आयुष्य प्रसंगांनी भरलेले असल्यामुळे ३६८ पानांचे पुस्तक लिहूनही बऱ्याच गोष्टी त्यांनी थोडक्यात आवरत्या घेतल्या आहे. बऱ्याच ठीकाणी व्याकरणाच्या चुका असून एखाद्या भाषातज्ञाकडून प्रूफ तपासावयास हवे होते. एकंदरीत पुस्तक अतिशय सुंदर असून वाचक ते वाचताना भारवून जातो. सध्याच्या परीस्थितीत जेव्हा इमानदार पोलीस सापडणे दुर्मिळ झाले आहे, वाय. सी. पवारांच्या कारकीर्दिकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.


जगाची मुशाफिरी – निरंजन घाटे दर्जा ****

September 18, 2005

jm.jpgआज मी जगाची मुशाफिरी हे निरंजन घाटे यांनी लिहीलेले पुस्तक वाचून संपवीले. निरंजन घाटे हे एक उत्कृष्ट विज्ञानकथा लेखक असून काही वेळा इतर किरकोळ लेखनही करतात. त्यांची लेखनशैली सुबोध असून ओघवती आहे, त्यामुळेच ते माझे आवडते लेखक आहेत. हे पुस्तक प्रवासवर्णन असल्याप्रमाणे वाटते परंतू लेखकाने कुठेही प्रत्यक्ष प्रवास केल्याचे म्हटलेले नाही. त्यात जागाच्या कानाकोपऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचे यापुस्तकात वर्णन असल्यामुळे त्यासर्व जागी प्रवास करणे लेखकाला अशक्य असल्याचे वाटते.
पुस्तकात एकूण ८८ पृष्ठे होती. ५ सप्टेंबर २००५ ला हे पुस्तक मी वाचावयास सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर २००५ ला संपविले. नुकतेच सभासदत्व पत्करलेल्या सदाशिव पेठेतल्या मराठी साहित्य परीषदेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मी मिळवले होते. हे पुस्तक आणि आणखिन एक पुस्तक अनिल काळे यांनी अनुवादीत केलेले ट्रीनिटिज चाईल्ड मी साहित्य परीषदेतून सभासद झाल्यानंतर प्रथमच घेतले. वेळ न पुरल्यामुळे ट्रीनिटिज चाईल्ड हे पुस्तक पुर्ण वाचू शकलो नाही.
पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे हे एक भूगोलतज्ञ असून पुण्यातच रहातात. विज्ञानविषयक दृष्टीकोन आणि ज्ञान यांचा सर्वसाधारण समाजामध्ये प्रसार करणे हा घाटे यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांचे लिखाण सोपे आणि तांत्रिक क्लिष्टता टाळणारे असते. त्यामुळे माझ्यासारख्या विज्ञानप्रवीण माणसाला त्यांचे लिखाण अपुरे वाटण्याची शक्यता आहे. परंतू घाटे यांचा वाचकवर्ग सर्वसामान्य माणूस आहे हे लक्षात घेतल्यास ते योग्यच असल्याचे जाणवते.
या पुस्तकात लेखकाने जगातल्या विविध देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण ठीकाणांची आणि तिथल्या लोकांची मनोरंजक माहीती दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे एक लेख संग्रह असून तो कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिध्द झाला होता का याचा लेखकाने कुठेही उल्लेख केलेला नाही. पुस्तकात दिलेली माहिती संक्षीप्त आणि मनोरंजक आहे. पुस्तकात अनेक व्याकरणाच्या चुका असून प्रकाशकाने त्याकडे लक्ष पुरविलेले दिसत नाही.
पुस्तकात एकूण १९ लेख असून लेख क्रमांक ७ जो युरोप मधल्या प्रसिध्द कलाकृतींच्या चोऱ्यांच्या संदर्भात होता मला विशेष करुन आवडला. लेख क्रमांक १० मध्ये लेखकाने मध्य भारतात सापडलेल्या डायनोसॉरच्या अंड्याविषयी लिहीले आहे. त्यात स्थानिक भारतियांनी कसे या अंड्यांना शिवलिंग समजून त्याभोवती मंदीर बांधून त्याची पुजा चालू केलेली आहे याचे वर्णन आढळते. हा लेखही मला आवडला. लेखकाने हे सर्व लेख लिहिण्यासाठी अनेक संदर्भग्रंथांचा वापर केला असल्याचे दिसते. परंतू लेखकाने कुठेही त्यांचा उल्लेख केलेला नाही. ही एक मोठी चूक असून माझ्या सारख्या संशोधक वृत्तीच्या माणसाला अधिक माहीती साठी संदर्भ सुचीचा मोठा उपयोग झाला असता. परंतू आजच्या युगात इंटरनेटवर कुठल्याही गोष्टीचा शोध घेणे सहज शक्य असल्याने जाणकार माणसाला तशी काही अडचण भासण्याची शक्यता नाही.


मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके

September 16, 2005

burst2.jpgमी आजतागायत वाचलेल्या काही पुस्तकांची यादी मी खाली देत आहे. ही यादी परीपुर्ण नसून मला आठवेल त्या प्रमाणे मी ही यादी बनविलेली आहे. यादीची रचना खालील प्रमाणे आहे.

 

 

पुस्तकाचे नाव – लेखक – प्रकार – दर्जा   १. चंद्रावरचा खून – द. पा. खांबेटे – विज्ञानकथा – *****
२. हेरॉईनचे सौदागर – विजय देवधर – रहस्यकथा – ****
३. दुसरे महायुध्द – वि. स. वाळींबे – इतिहास – *****
४. वॉर्सॉ ते हिरोशिमा – वि. स. वाळींबे – इतिहास – *****
५. पॅपिलॉन – रविंद्र गुर्जर – अनुवादीत रहस्यकथा – *****
६. बॅंको (पॅपिलॉन भाग २) – रविंद्र गुर्जर – अनुवादीत रहस्यकथा – *****
७. मुसोलीनी – मदन पाटील – चरित्र – ***
८. काश्मिर एक ज्वालामुखी – सेतू माधवराव पगडी – राजकीय – ****
९. अँग्री हील्स – रवींद्र गुर्जर, चंद्रशेखर बेहेरे (मुळ लेखक – लिऑन उरीस) – अनुवादीत रहस्यकथा – ***
१०. माओचे लश्करी आव्हान – दि. वी. गोखले – राजकीय – ****
११. दि किलर्स – मदन पाटील – अनुवादीत रहस्यकथा – ***
१२. वॉलॉंग एका युध्दकैद्याची डायरी – कर्नल श्याम चव्हाण – युध्द इतिहास – ****
१३. सुर्यकोटी समप्रभ – माधव साखरदांडे – विज्ञान – ****
१४. कृष्णमेघ – उल्हास देवधर – विज्ञानकथा – ****
१५. युध्दकथा – राजा लिमये – युध्द इतिहास – ***
१६. अब्राहम लिंकन – न. ल. वैद्य – चरित्र – **
१७. मुंबईच्या नवलकथा – गंगाधर गाडगीळ – इतिहास – ****
१८. मुलूखगिरी – द्वारकानाथ संझगिरी – प्रवासवर्णन – *****
१९. देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर – बाळ भागवत – विज्ञान – *****
२०. डोमेल ते कारगिल – मे. ज. शशिकांत पित्रे – युध्द इतिहास – ***
२१. Cosmos – Carl Sagan – Science – ***
 मराठी भाषेतल्या पुस्तकांचाच रसास्वाद ब-यापैकी घेता येत असल्याने प्रामुख्याने माझे वाचन मराठी पुस्तकांचेच आहे. तरीही आता मी काही प्रमाणात इंग्रजी पुस्तकांचे वाचनही सुरु केले आहे. इंटरनेटच्या स्वरुपात ज्ञानाचा एक मोठा विश्वकोषच खुला झाल्याने वाचनाला आता काही मर्यादा राहीलेली नाही. इंटरनेटवर सर्व प्रमुख इंग्रजी पुस्तकांची ई-बुक आवृत्ती उपलब्ध असल्याने ते विकत घेण्याचीही गरज भासत नाही. इंटरनेटवर गुटेनबर्ग डॉट ऑर्ग नावाची एक वेबसाईट आहे. त्यावर जवळपास २०००० हून अधिक अशा पुस्तकांची डिजीटल आवृत्ती मोफत उपलब्ध आहे ज्याचे प्रकाशन १९०० साल अगोदर झाले होते आणि ज्याचे कॉपीराईट्स संपुष्टात आलेले आहेत, कींवा जे साहीत्य लेखकांनी किंवा संस्थांनी सर्व लोकांसाठी मोफत प्रकाशित केलेले आहे. मला वाटते की असा उपक्रम मराठी पुस्तकांच्या बाबतीही राबवला जावा. आपले साहित्य कालौघात नष्ट होण्यापेक्षा इंटरनेटच्या जाळ्यात अनंतकाळ पर्यंत जगावे असे कोणाला वाटणार नाही?         

  


Follow

Get every new post delivered to your Inbox.